“आता मागे हटायचे नाही, विजय मिळवायचा आणि तोपर्यंत मुंबईतून परत फिरायचे नाही,”: मनोज जरांगे पाटील

“आता मागे हटायचे नाही, विजय मिळवायचा आणि तोपर्यंत मुंबईतून परत फिरायचे नाही,”: मनोज जरांगे पाटील

अंतरवाली सराटी / जालना कव्हरेज न्यूज: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा रणभूमीत उतरण्याच्या तयारीत आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत निर्णायक आंदोलनाची हाक दिली आहे. अंतरवाली सराटी येथे २९ जून रोजी झालेल्या मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. या बैठकीला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते, ज्यामुळे ही बैठक ऐतिहासिक ठरली.

जरांगे पाटील यांनी यावेळी ठामपणे सांगितले की, आता ही लढाई आरपारची आहे. “आता मागे हटायचे नाही, विजय मिळवायचा आणि तोपर्यंत मुंबईतून परत फिरायचे नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठा समाजाने गेल्या दोन वर्षांपासून आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. आता हा लढा अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक, प्राध्यापक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो का?

या बैठकीत “एक मराठा, लाख मराठा”, “लढेंगे, जितेंगे, हम सब जरांगे”, “कोण आला रे, कोण आला, मराठ्याचा वाघ आला” अशा जोशपूर्ण घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाच्या एकजुटीने विरोधकांना चांगलाच इशारा मिळाला आहे. जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाने देशाला एकजुटीने लढण्याची ताकद दाखवून दिली आहे. “प्रत्येक वेळी आपल्याला नावे ठेवली गेली, पण तुमच्या या प्रचंड एकजुटीसमोर मी नतमस्तक आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

त्यांनी राजकीय पक्षांवरही टीका केली. “राजकीय लोक त्यांच्या पक्षासाठी, निवडणुकांसाठी रात्रंदिवस मेहनत घेतात, पण मराठा समाजाच्या लेकरांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी कोणीच पुढे येत नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा मराठा असो, आता प्रत्येकाने आपल्या समाजासाठी लढण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी ठणकावले.

आंदोलनाची रणनीतीही यावेळी जाहीर करण्यात आली. २७ ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा शहागड, पैठण, शेवगाव, पाढरी पूल, आळा फाटा, शिवनेरी दर्शन, कल्याण, चेंबूर मार्गे २९ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचेल. “हा मोर्चा शांततेच्या मार्गाने असेल, पण मराठा समाजाची ताकद दाखवणारा असेल. सहा कोटी मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकणार आहे,” असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

या बैठकीत मराठा समाजाने आपली एकजूट आणि ताकद दाखवली आहे. “हा फक्त एक मोर्चा नाही, तर विरोधकांना एकजुटीने दिलेली चपराक आहे,” असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या या ऐतिहासिक लढ्याचा “ट्रेलर” अंतरवाली सराटीत झाला असून, “पिक्चर” २९ ऑगस्टला मुंबईत गाजणार आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on ““आता मागे हटायचे नाही, विजय मिळवायचा आणि तोपर्यंत मुंबईतून परत फिरायचे नाही,”: मनोज जरांगे पाटील”

Leave a Comment

WhatsApp Join Group!