शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील एका २६ वर्षीय तरुणीला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी शेगाव शहरातील बाळापूर रोडवरील आनंद सागर परिसरात घडली.
फिर्यादी पूजा निलेश वाडेकर (रा. चांदूर रेल्वे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या शेगाव रेल्वे स्टेशनकडे जात असताना आरोपी सुनील नंदू सपकाळ (वय २८, रा. भीवगाव, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) याने त्यांना आवाज देत थांबवले आणि “मला तुझ्याशी बोलायचं आहे” असे सांगितले. त्यानंतर त्याने त्या युवतीला ऑटोमध्ये बसवून आनंद सागर परिसरात नेले आणि “तू माझ्यावर केलेली केस मागे घे” असा दबाव आणला. त्याच वेळी नंदू सपकाळ (वय ५०, रा. भीवगाव) यानेही तिच्यावर अश्लील शिवीगाळ केली. दोघांनी मिळून तिला लोटपाट करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपी सुनील सपकाळ आणि नंदू सपकाळ (दोघे रा. भीवगाव, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंकल्पना २०२३ नुसार कलम २९६, ११५(२), ३५१(२)(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नापोको निलेश गाडगे हे करीत आहेत.














