जालना कव्हरेज न्युज: अंढेरा परिसरात कायद्याचा धाक कमी होत चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना २८ फेब्रुवारी रोजी चिंचखेड शिवारात घडली. शेतातील पाईपलाईनचे काम पूर्ण करून घरी परतत असलेल्या जेसीबी चालकाला रस्त्यात अडवून काठीने मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता चालकाच्या आई व काकूलाही ढकलून शिवीगाळ करण्यात आल्याची बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा तालुक्यातील शेळगाव जहागीर येथील शैलेश शरद बंगाळे हे जेसीबी ऑपरेटर म्हणून पाईपलाईनच्या कामावर कार्यरत होते. काम आटोपून ते जेसीबी घेऊन घराकडे परतत असताना चिंचखेड शिवारात आरोपी राजेंद्र रामदास वायाळ याने त्यांची जेसीबी अडवली.
यानंतर आरोपीने चालकाला जबरदस्तीने खाली ओढून शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. तसेच “या रस्त्याने जेसीबी आणली तर जेसीबी जाळून टाकीन,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, चालकावर होत असलेली मारहाण पाहून त्याची आई व काकू घटनास्थळी धावत आल्या व भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही ढकलून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलांशीही अशा प्रकारची वर्तणूक झाल्याने घटनेची गंभीरता अधिक वाढली आहे.
या प्रकरणी शैलेश बंगाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी राजेंद्र वायाळ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) व ३५२ अंतर्गत अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मात्र, सार्वजनिक रस्त्यावर काम करणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण करण्याइतपत धाडस आरोपीला कसे झाले, हा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. अशा घटनांमुळे कामगार व वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.















