चिखली भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची पिळवणूक…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)हे कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी की दलालांच्या कमाईसाठी?”, असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमधून आहे.

शेताची मोजणी, पी आर कार्ड काढणे आणि भुमी अभिलेख संबंधित इतर कामांसाठी अर्ज केल्यास थेट दलालांच्या माध्यमातून पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सातबाऱ्यावरील पोटखराब जमीन विहिती करण्यासाठी लागणारी कार्यवाही महिनोन महिने प्रलंबित ठेवून पैशासाठी हेतुपुरस्सर अडथळे निर्माण केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पैसे दिल्यास दुसऱ्याच दिवशी काम पूर्ण, तर पैसे न दिल्यास सहा सहा महिने लांबवण्याचा ‘नियम’ येथे राबवला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

ग्राम गोदरी येथील शेतकरी मोळवंडे यांचा गोद्री गट क्रमांक ५३ मधील पोटखराब जमीन विहितीचा अर्ज अनेक महिने प्रलंबित राहिल्याने, संतापाच्या भरात त्यांनी ६ ऑगस्ट रोजी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय, कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचे विशिष्ट ऑनलाइन सेंटरसोबत संगनमत असल्याचे समोर आले आहे. अर्जदारांना ठराविक केंद्रावर पाठवून दामदुप्पट, तिप्पट रक्कम आकारल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय या कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. शेतकरी कार्यालयात आला की दलाल त्याला हेरतात आणि पैसे उकळतात. दलाल कर्मचाऱ्यांच्या आगोदर कार्यालयात हजर असतात आणि दिवसभर कार्यालयात ठाण मांडून बसतात.

या पार्श्वभूमीवर भाजप चिखली शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी ९ ऑगस्ट रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि दलालांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, कार्यालयात प्रामाणिक, सक्षम आणि कार्यतत्पर उपअधीक्षकांची नियुक्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका मांडली. आता सर्वांचे लक्ष महसूल मंत्रालयाकडे लागले असून, कारवाई करण्यात येईल की गाडा तसाच सुरू राहील, या बाबद नागरिकांना उत्सुकता लागून आहे.


चार लिपिकांकडे पोटखराब दुरुस्तीचे काम
माझ्याकडे जळगाव जामोदचा रेग्युलर पदभार आहे. येथील व्यक्ती सुटीवर गेल्यामुळे माझ्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे मला येथील जास्त माहिती नाही. परंतु पोटखराब दुरुस्तीचे ४०० प्रकरण प्रलंबित होते. ते एकाच लिपिकाकडे होते. आता ते चार लिपिकांकडे वाटप केले आहे. आता याबाबत अडचण येणार नाही.
-डी. आर. गोसावी
अतिरिक्त उपअधीक्षक चिखली भूमिअभिलेख कार्यालय

Join WhatsApp

Join Now

1 thought on “चिखली भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची पिळवणूक…”

Leave a Comment