चिखली (जालना कव्हरेज न्यूज): ज्या विद्यार्थिनीच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती, ती विद्यार्थिनी अखेर आपल्या चुलत भावासोबत लग्न करून आळंदी येथे सापडली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील एका गावात घडली असून, यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
१८ वर्षीय ही मुलगी नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली आहे. तिच्या वडिलांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाच्या योजना आखल्या होत्या. मात्र, ३ जुलै रोजी रात्री जेवणानंतर सर्वजण झोपले असताना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ती मुलगी घरातून पळून गेली.
ती आपल्या गावातील चुलत भाऊ असलेल्या एका तरुणासोबत पळून गेली. सकाळी उठल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच तिच्या पालकांनी तातडीने पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.
दरम्यान, ती मुलगी आणि तो तरुण यांनी आळंदी येथे जाऊन लग्न केले आणि नंतर पोलिस स्टेशनला हजर राहून त्यांनी आपण विवाह केल्याची माहिती दिली.
विशेष म्हणजे, यापूर्वीही या मुलीने दहावीत असताना त्या तरुणासोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या तरुणावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
आता पुन्हा त्याच तरुणासोबत पळून जाऊन विवाह केल्यामुळे संपूर्ण गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही घटना त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि भावकीसाठीही लज्जास्पद ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
2 thoughts on “खळबळजनक! बेपत्ता विद्यार्थिनीने चुलत भावासोबतच केले लग्न; चिखली तालुक्यातील घटना”