किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
वाघाला पंचायत समिती सर्कलमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इच्छुकांची गर्दी वाढत चालली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध पक्षातील नेत्यांनी आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून, सर्कलमध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे अनंतकुमार खरात हे आता चर्चेत आहेत. पक्षाने संधी दिल्यास ते या सर्कलमधून निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याची चर्चा सुरू आहे. खरात हे स्थानिक पातळीवर सक्रिय असून, जनसंपर्क आणि सामाजिक कार्यामुळे त्यांचे नाव पुढे आले आहे.
दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे अविदास बंगाळे यांनीही जोरदार तयारी सुरू केली असून, त्यांनी “गुडघ्याला बाशिंग बांधून” रणांगणात उतरण्याची तयारी केली आहे.
याशिवाय, राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर्फे प्रभाकर कायदे हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. ते आपल्या गटाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.
तर भाजपकडून धनंजय घुगे यांचे नाव पुढे येत असून, तेही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे वाघाला पंचायत समिती सर्कलमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक गट आपल्या उमेदवाराला उभे करण्यासाठी धोरण आखत असून, पुढील काही दिवसांत या सर्कलमध्ये राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
किनगाव राजा सर्कलमध्ये पंचायत समिती निवडणुकीची चाहूल; इच्छुकांची वाढती गर्दी! राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप गटांमध्ये रस्सीखेच सुरू; वाघाला पंचायत समिती सर्कलमध्ये राजकीय तापमान वाढले….
Published On: October 15, 2025 11:36 pm
















