सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील एका वीज खांबावर दुरुस्तीचे काम सुरू असताना दोन कर्मचारी खाली पडून जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. यापैकी एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, दुसऱ्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीड फॉर्मजवळील एका विद्युत खांबावरील एबी स्विच खराब झाल्याने ते दुरुस्त करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता महावितरणचे कर्मचारी अतिश चव्हाण (वय ३२) आणि कंत्राटदाराचा बिहार येथील कर्मचारी सिनुट्यू उर्फ मलिंगा (वय २५) हे दोघे खांबावर काम करत होते. यावेळी अचानक विद्युत प्रवाह विरुद्ध दिशेने (रिटर्न करंट) आल्याने मलिंगा उंचावरून खाली फेकला गेला, तर अतिश हा खांबावर लटकून राहिला.
कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव या घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीचे स्थानिक उपअभियंता श्रीनिवास बडगु, कनिष्ठ अभियंता सुरेश होले व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तसेच या संदर्भात बुलडाणा येथील विद्युत निरीक्षक कार्यालयाला माहिती दिली.
उंचीवरून खाली पडलेल्या मलिंगा याला जबर मार लागला. त्याला प्रथम स्थानिक व नंतर जालना येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
अतिश चव्हाण यांच्या पायाला जबर मार असल्याने त्यांना स्थानिक जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांची प्रकृती स्थिर असून, मलिंगाच्या छातीत व अन्य ठिकाणी गंभीर मार असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे.















