भोकरदन/जालना कव्हरेज न्यूज: भोकरदन तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दामू भिमराव रोजेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शाळेत दारूच्या नशेत आढळून आल्याने आणि त्यांच्या खिशात दारूची बाटली सापडल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिनू यांनी याबाबत आदेश जारी केले असून, निलंबन काळात रोजेकर यांना मंठा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जाफ्राबाद तालुक्यात हुमणी अळीचे थैमान; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शासना कडून नुकसान भरपाईची मागणी
ही घटना ११ जुलै २०२५ रोजी घडली. टाकळी येथील प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक दामू भिमराव रोजेकर हे दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत आढळले. याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचे गट समन्वयक एस. बी. नेवार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रभारी गट शिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर आणि प्रभारी गट विकास अधिकारी महेंद्र साबळे यांनी रोजेकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला.
“लाडकी बहिण योजना”तून हजारो महिला अपात्र; जिल्ह्यात २२ हजार महिलांना फटका….
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिनू यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, दामू भिमराव रोजेकर यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम कायदा १९६४ आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा २००९ यांचा भंग केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे शाळेच्या शिस्तीवर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात त्यांना मंठा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयात हजर राहावे लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये, याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येते. गावकऱ्यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, शाळेत शिस्त आणि शिक्षणाची गुणवत्ता राखली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
3 thoughts on “दारूच्या नशेत शाळेत गेले मुख्याध्यापक अन् गावकऱ्यांना माहिती होताच… भोकरदन तालुक्यातील घटना”