सोलर प्रकल्पाच्या कामातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अंढेरा परिसरात खळबळ, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

mulgi bepatta Andhera

अंढेरा (जालना कव्हरेज न्यूज): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात सोलर प्लांटच्या कामावर असलेल्या जेसीबी ऑपरेटरने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. २६ फेब्रुवारी रोजी ही बाब समोर आली असून ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावाजवळ सोलर प्लांट उभारणीचे काम सुरू असून त्या ठिकाणी शंकरलाल चिरोजीलाल धुर्वे हे कंत्राटी काम पाहत होते. त्याच ठिकाणी जेसीबी मशीन चालविण्याचे काम आरोपी मुकेश शामराव मंझा हा ऑपरेटर म्हणून करत होता. कामाच्या निमित्ताने गावात ये-जा वाढत असताना आरोपीची संबंधित अल्पवयीन मुलीशी ओळख झाली आणि पुढे मोबाईलद्वारे संवाद सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

१० फेब्रुवारीच्या पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास मुलीची आई जागी झाली असता मुलगी घरात नसल्याचे तिच्या लक्षात आले. घरासह परिसरात शोध घेऊन तसेच नातेवाईकांकडे चौकशी करूनही मुलीचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढत गेली.

दरम्यान, सोलर प्लांटवर काम करणारा जेसीबी ऑपरेटर मुकेश मंझा हाही अचानक कामावरून गायब झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे संशय अधिक बळावला आणि मुलीच्या वडिलांनी आरोपीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याची तक्रार अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.

तक्रारीच्या आधारे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी व मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली वेगवान केल्या आहेत.

दरम्यान, गावात सुरू असलेल्या बाहेरील कामांमुळे परगावाहून येणाऱ्या कामगारांची वाढती वर्दळ आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न यावरही चर्चा सुरू झाली आहे. अल्पवयीन मुलां-मुलींवर मोबाईलद्वारे होणारा प्रभाव आणि पालकांची वाढती चिंता या पार्श्वभूमीवर ही घटना गंभीर मानली जात आहे.

ग्रामीण भागात विकासकामे सुरू असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना कितपत काटेकोरपणे राबवल्या जातात, तसेच अल्पवयीन मुलांच्या संरक्षणाबाबत स्थानिक यंत्रणा किती सजग आहे, हा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होताना दिसत आहे. त्यामुळे ही घटना केवळ गुन्ह्यापुरती मर्यादित न राहता समाजासाठी इशारा ठरणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment