नात्यांनाच काळिमा फासणारी घटना; राहुड हादरले, प्रश्न मात्र अनुत्तरितच!

rahud crime

पिंपळगाव राजा (जालना कव्हरेज न्यूज): तालुक्यातील राहुड येथे घडलेली सख्ख्या भावाकडूनच लहान भावाची निर्घृण हत्या ही घटना केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नसून समाजातील नातेसंबंधांच्या बदलत्या वास्तवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडलेली ही धक्कादायक घटना पोलिस तपासादरम्यान २६ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

मृतक चेतन संजय इंगळे आणि आरोपी मोठा भाऊ रोशन संजय इंगळे हे सख्खे भाऊ असून, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा वाद इतक्या टोकाला जाईल आणि त्याचा शेवट रक्तरंजित घटनेत होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.

चेतन इंगळे अचानक बेपत्ता झाल्यानंतर गावचे पोलीस पाटील विलास बनसोडे यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ठाणेदार भागवत मुळीक यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत विशेष पथकाची नियुक्ती केली. सुरुवातीला बेपत्ता प्रकरण म्हणून पाहिले जात असलेले हे प्रकरण तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे धक्कादायक वास्तव समोर येऊ लागले.

चेतनचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिसांनी संशयाच्या आधारे मोठा भाऊ रोशन इंगळे याची चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या रोशनने अखेर पोलिसी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. २५ फेब्रुवारीच्या रात्री स्वतःच्या शेतात लोखंडी रॉडने चेतनच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचे त्याने सांगितले. इतकेच नव्हे, तर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून त्याचे अवशेष पूर्णा नदी पात्रात टाकल्याची कबुलीही त्याने दिल्याने पोलिसांनाही धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच खामगाव येथील फॉरेन्सिक पथक तसेच अकोला येथील डॉग स्कॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तपासादरम्यान मानवी अवशेष आणि अन्य महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून गुन्ह्याची साखळी स्पष्ट होत गेली.

या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी रोशन इंगळे याच्यासह त्याला मदत केल्याच्या आरोपावरून रवी राऊत (वय ३५, रा. महाकाल चौक, खामगाव) याला अटक केली आहे. दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा तसेच पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी एएसपी श्रेणिक लोढा, डीवायएसपी प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक भागवत मुळीक यांनी भेट देत तपासाची पाहणी केली. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांच्या तत्पर तपासामुळे अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा उलगडा झाला असला, तरी सख्ख्या भावानेच भावाची हत्या केल्याची घटना समाजमनाला अस्वस्थ करणारी ठरत आहे. किरकोळ वाद इतक्या टोकाला कसे पोहोचतात आणि नात्यांतील संवाद का हरवत चालला आहे, हा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

एकेकाळी आधार मानली जाणारी नातीच जर संशय आणि रागाच्या आगीत जळू लागली, तर समाज कोणत्या दिशेने चालला आहे, याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment