चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): अंचरवाडी येथील रहिवासी आणि गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले संतोष दत्तात्रय परिहार यांची चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी २४ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेल्या नियुक्तीपत्राद्वारे ही नेमणूक जाहीर करण्यात आली.
संतोष परिहार यांनी पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखत चिखली तालुक्यातील ग्रामीण भागात पक्षाचे कार्य जोमाने पुढे नेले आहे. विशेषतः शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. परिहार यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे, जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे आणि जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांना दिले आहे.
नियुक्तीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना संतोष परिहार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून जो विश्वास दाखवला आहे, त्याची परतफेड मी चिखली तालुक्यात पक्षाचा पाया अधिक मजबूत करून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून करेन. मी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.”
परिहार यांच्या या निवडीबद्दल चिखली तालुक्यातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष तालुक्यात नव्या जोमाने कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















