शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेगाव शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात १८ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. दारूच्या अमलाखाली असलेल्या रफीक शहा लतीफ शहा नावाच्या व्यक्तीने चुकून आपल्या बहिणीचे घर समजून शेजारच्या एका विवाहित महिलेच्या घरात प्रवेश केला. मात्र, घरात शिरताच त्याने दरवाजा आतून बंद केला आणि त्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

पीडित महिलेने स्वत:चा बचाव करण्यासाठी जोरदार प्रतिकार केला आणि मोठ्याने ओरडून मदत मागितली. तिच्या या आवाजामुळे आरोपीची पकड सैल झाली आणि ती त्याच्या तावडीतून सुटून दरवाजा उघडत घराबाहेर पळाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
घटनेच्या तक्रारीनंतर पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, शेगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपी रफीक शहा लतीफ शहा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तडोळे हे ठाणेदारांच्या सूचनांनुसार करत आहेत.














