येवता/जालना कव्हरेज न्यूज: जाफ्राबाद तालुक्यातील येवता गावातील शेतकऱ्यांनी शाळकरी मुलांना सोबत घेऊन रस्ता बंदच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या या लढ्याला यश आलं असून, आता रस्ता खुला झाला आहे. गट क्रमांक ३३ मधील हा रस्ता वेनुबाई अंबादास ससोदे यांनी २०२३ पासून बंद केला होता. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी, मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि गावकऱ्यांना रोजच्या कामासाठी खूप त्रास होत होता.
या रस्त्याशिवाय गावकऱ्यांना आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक शेतकरी अजंदर आणि दगडू तोताराम सिरसाट यांनी सांगितलं, “आम्ही तहसीलदारांकडे तक्रार केली होती. १५ मे २०२४ रोजी त्यांनी रस्ता खुला करण्याचा आदेश दिला, पण काहीच झालं नाही. ९ जून, १८ जून आणि २० जून रोजी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन तपासणी केली, तरी रस्ता बंदच राहिला.” या उपोषणात शाळकरी मुलंही सहभागी झाली. “आम्हाला शाळेत जायचंय, रस्ता द्या!” असं म्हणत मुलांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. “आदेश होतात, पण कोणीच ऐकत नाही. आम्हाला न्याय कसा मिळणार?” असा प्रश्न त्यांनी विचारला. तहसीलदारांनी ७ जुलै २०२५ पर्यंत रस्ता खुला करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ती तारीख निघून गेली तरी काहीच झालं नव्हतं. शेवटी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आणि आंदोलन जिल्ह्यापर्यंत नेण्याचा इशारा दिला.
अखेर, तहसीलदार सरिता भगत यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने रस्ता खुला केला. आता मुलं शाळेत जाऊ शकतील, शेतकरी शेतात काम करू शकतील. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, बिट जमादार गजानन गावंडे, कॉन्स्टेबल विजय जाधव, हेड कॉन्स्टेबल निकम, कॉन्स्टेबल पंडित तसेच महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी इत्यादींच्या उपस्थित हा रास्ता खुला करण्यात आला.